लातूर : लातूर शहरातील वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलून त्या ऐवजी नवीन मीटर बदलून देण्यासाठी आलेले कंपनीचे कर्मचारी नागरिकांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना कोणतीही रक्कम देऊ नये असे आवाहन स्व. अटलबिहारी बाजपाई विचार मंचच्या वतीने करण्यात येत आहे.
मीटर बदलून देण्याकरिता आलेले कर्मचारी नागरिकांकडून थेट रक्कम घेत असल्याची चित्रफीत तयार करून ती विचार मंचाच्या वतीने अधीक्षक अभियंता, म . रा. वि. म . लातूर, याना पाठविण्यात आली आहे. तरी याबाबतीत सदर व्हिडीओ चित्रफितीची चौकशी करून सदरहू कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच लहान - मोठे उद्योग महाराष्ट्रात यावे म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. पण वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ अधिकारी उद्योगाचे नवीन डीपीचे कामात सहकार्य करीत नाहीत. याचीही मुख्य अभियंत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन स्व. अटलबिहारी बाजपाई विचार मंचचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे , जमील नाना, मोहन कांबळे, रामेश्वर भराडिया, किशोर जैन आदिंनी केले आहे.