यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र कोरोना उपचार कक्ष
संभाव्य लहान मुलातील कोरोना आजाराबाबत आज पालकांसाठी ऑनलाईन संवाद
लातूर दि.०४- कोरोना आजाराने राज्याला नव्हे तर देशाला वेठीस धरले. या आजाराची पहिली आणि दुसरी लाट संपता ना संपता तोच लहान बालकांना धोका निर्माण करणारी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार लातूर एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सोयींनियुक्त सुसज्ज स्वतंत्र कोरोना बालरोग कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती मेडीकल कॉलजचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी दिली.
कोरोना या आजारामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना या आजाराची बाधा झाल्याने आरोग्य विभागासह सर्व यंत्रणांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत घेतली. अनेक प्रयत्न करूनही कांहीना जीव गमवावा लागला असला तरी बहुसंख्य रूग्ण बरे होवून घरी गेले. पहिल्या लाटेत शहरी भागातील तर दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील जनतेला या आजाराने ग्रासले होते.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवर यशस्वीपणे मात केल्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता आरोग्य तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार शासन आणि प्रशासन योग्य ती पावले उचलत असून लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी सर्व सोयींनियुक्त अद्यावत कोरोना उपचार स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्वतंत्र कक्षात १० अतिदक्षता बेड, ४० ऑक्सिजन बेड अद्यावत करून सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर लहान बालकांना मानसिक तनाव येणार नाही आनंदी, प्रफुल्लीत वातावरण निर्माण रहावे यासाठी या कक्षात विविध छायाचित्रे लावून सजावट करण्यात आली आहे.
लहान बालकांतील कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरसह इतर कर्मचारी यांची टिम सज्ज करण्यात आली असून या कोरोना कक्षाची जबाबदारी बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या बालकांच्या पालकांसाठी स्वतंत्रपणे राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. असे सांगून डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, बालकाच्या पालकांनी या आजाराकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असून सर्दी, ताप व इतर कोणतीही लक्षणे आढळली तर घाबरून न जाता बालरोग तज्ञांशी तात्काळ संपर्क करून सल्ला घेवून उपचार करावेत. कसलाही आजार असला तरी फार काळ अंगावर काढू नये असे आवाहन केले.
आज पालकांसाठी संवाद
लातूर एमआयटीच्या फिजीओथेरपी विभागामार्फत कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिवसानिमित्ताने लहान मुलांत होणा-या संभाव्य कोविड -१९ चा संसर्ग व फिजीओथेरपीची भूमिका या विषयावर ५ जून शनिवार रोजी सकाळी ११ वाजता झूम अॅपवर ऑनलाईन संवाद (वेबीनार) आयोजित करण्यात आला असून या ऑनलाईन कार्यक्रमात जास्तीत जास्त पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार आणि फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव यांनी केले आहे.