वुमन्स डॉक्टरर्स विंगने साजरा केला वेगळा महिला दिन
लातूर ;दि.८( प्रतिनिधी ): खूप जास्त न शिकलेल्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पण कर्तृत्ववान महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमन्स डॉक्टर्स विंगच्या लातूर शाखेने साडी-चोळी देऊन त्यांचा उचित सन्मान केला आणि खऱ्या अर्थाने 'महिला दिन 'आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
जागतिक महिलादिन म्हणजे महिलांवर विविध वृत्तपत्रातून लेख लिहिणे ...सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल भरभरून लिहिणे…. कार्यक्रम आयोजित करणे आदी ...आदी ...महिलांचे कौतुक सोहळे सर्वत्र सर्रासपणे दरवर्षी आयोजित केले जातात. परंतु या सर्वाला फाटा देत जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आय एम ए वुमन्स डॉक्टर विंगच्या लातूर शाखेने ' ती आहे म्हणून सारे विश्व आहे ' ही थीम असलेला नेटका , उपयुक्त आणि आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे .आणि यामुळेच लातुरातील महिला डॉक्टर्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांसाठी काम करणारी देशभरातील अग्रगण्य संस्था आहे . लातूर शाखेचे जिल्हाध्यक्ष, ममता हॉस्पिटल मधील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ.विश्वास कुलकर्णी व वुमन्स डॉक्टर विंगच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टरांवर विश्वास कुलकर्णी यांनी खूपच विचारपूर्वक एका चांगल्या रचनात्मक कार्याला सुरुवात करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मदतीतून एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता . खूप जास्त न शिकलेल्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पण, कर्तृत्ववान या महिलांचा उचित सन्मान करावा यासाठी जागतिक महिला दिनी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. अशा महिलांना वुमन्स डॉक्टर विंगच्या वतीने साडीचोळी देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. यात मीरा सांडुर , मेहरुन्निसा शेख, फुलाबाई कांबळे , उमा लोकरे, यास्मिन शेख, आशाबाई कांबळे, सिंधूमावशी , वनिता कोळी, निशाबाई आष्टुरे , संगीता दुधभाते , वैजंतीबाई जाधव , लक्ष्मीबाई बनाळे, नसरीन शेख, लता मावशी , सविता सिस्टर , कल्पना ताई , सीमा बेलसरे , महानंदा सिस्टर , अनिता मावशी आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य तथा कॉलेज ऑफ फिजिशियनस अॅण्ड सर्जनचे प्रमुख डॉ.गिरीश मैंदरकर यांच्या हस्ते या कर्तबगार महिलांचा साडीचोळी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ममता हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.माया कुलकर्णी , आय एम ए चे जिल्हाध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी , सचिव डॉ.चांद पटेल , वुमन्स डॉक्टर विंगच्या जिल्हाध्यक्ष डॉ.अनुजा कुलकर्णी, सचिव डॉ. रचना जजू , डॉ. ज्योती पाटील , डॉ.स्नेहल देशमुख , डॉ.परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. ऋजुता अयाचित , डॉ.वृषाली टेकाळे -चपळगावकर , आरती जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती .भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय सचिव कुमुदिनी भार्गव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कोरोनामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा दराडे , डॉ. कल्याणी सास्तुरकर यांनी केले.



