केंद्रेवाडी येथील कोंबड्याच्या मृत्यूबाबत पालकमंत्र्यांकडून चौकशी
आवश्यकत्या दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
लातूर प्रतिनिधी : १० जानेवारी २१ :
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील पोल्ट्री फार्म मधील कांही कोंबड्या अचानकपणे मेल्याची माहिती मिळताच लातूर जिल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला, यासंदर्भाने चौकशी करून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
देशातील कांही राज्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची चर्चा सुरु असताना अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एक पोल्ट्री फार्म मधील ३५० कोंबड्या अचानक दगावल्याची घटना घडली आहे. या संदर्भातील माहिती बाहेर येताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रसारमाध्यमातून हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी, जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून ही बाब गांभीर्याने घेण्याची सूचना केली. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा शोध घ्यावा, तोपर्यंत परिसरात आवश्यक ती काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी, पशुसंवर्धन विभागाला सतर्क करून केंद्रेवाडी परिसरात आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सांगितले आहे, मयत कोंबड्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्याच्या मृत्यूचे कारण कळणार आहे, तोपर्यंत नागरिकांनीही मांसाहराबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
