सुशिक्षित युवकांनी उद्योगाकडे वळावे - आ. धिरज देशमुख
विनय भुतडा लिखित 'अपडेटेड आयुष्य' पुस्तकाचे आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन
लातूर : प्रत्येकाला नोकरी, रोजगार मिळणे कठीण आहे. त्यामुळे सुशिक्षित युवकांनी उद्योगाकडे वळणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित प्रक्रिया उद्योगात अनेक चांगल्या संधी आहेत. यासाठी युवकांनी स्वत:ला उद्योजक होण्याच्या दृष्टीने घडवायला हवे, असे प्रतिपादन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर येथील युवा उद्योजक विनय भुतडा यांनी स्वानुभवावर लिहिलेल्या 'अपडेटेड आयुष्य' या पुस्तकाचे शनिवारी (दि.१७) रोजी आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथे प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी आ. धिरज देशमुख बोलत होते. यावेळी 'अपडेटेड आयुष्य' या पुस्तकांच्या २५० प्रती लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदारसंघातील ग्रंथालयांसाठी आ. देशमुख यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांच्याकडे या प्रती भेट देण्यात आल्या. यावेळी रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक सोपान मुंढे, माजी पंचायत समिती सदस्य जहांगीर सय्यद, लेखक विनय भुतडा, कैलास दरक आदींची उपस्थिती होते.
आमदार धिरज देशमुख यावेळी म्हणाले, 'अपडेटेड आयुष्य' हे पुस्तक तरुणांसह नवउद्योजकांसाठी उपयुक्त आहे. उद्योगाकडे वळणाऱ्या नव्या पिढीला नवी दिशा व प्रेरणा देण्याच्या उद्देशानेच ते लिहिले आहे. भुतडा उद्योजक असूनही लेखकाची भूमिका स्वीकारत पुस्तकरूपाने आपला अनुभव वाचकांसमोर आणला आहे, हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी सांगितले.