बिडवे इंजिनीअरींगमधील कॉम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांकडून गोकुळ बालसदनमध्ये मास्क व सॅनेटायजरचे वाटप
लातूर/प्रतिनिधी ः गुरुपौर्णिमेच्या पुर्व संध्येस येथील एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनीअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटना ‘सेसा’ च्यावतीनेलातूरच्या एमआयडीसी भागातील गोकुळ बालसदन अनाथाश्रमातील सर्व बालकांना मास्क आणि सॅनीटायजरचे वाटप केले.
भारतीय संस्कृतीत विविध सण उत्सवांना मोठ्या प्रमाणात महत्व दिले जाते. त्यानुसार गुरु/शिष्य परंपरेचा पुरस्कार करत गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर आपल्या भविष्याचा डामडौल उभा करण्याची परंपरा अनादी काळापासून आहे. त्याच अनुषंगाने विद्यार्थी कोणत्याही विद्याशाखेतील असला तरी तो गुरुंनी दाखविलेल्या मार्गावर चालत असतो. याचीच प्रचिती लातूरच्या एम.एस. बिडवे इंजिनीअरींग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनीअरींग शाखेच्या विद्यार्थ्यांनी आज घडवून दिली. गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला शिकवणार्या गुरुंना काही तरी भेट देण्याच्या उद्देशाने येथील विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबविला. कोरोना मुळे सगळीकडे एकप्रकारे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे इंजिनीअरींग कॉलेजच्या प्राध्यापकांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी सध्या कोरोनाच्या परिस्थितीत लढा देण्यासाठी सज्ज असलेल्या समाजात दूर्लक्षीत असलेल्या घटकास सहकार्य करण्याच्या विडा उचलला. याच भावनेेने विद्यार्थ्यांनी लातूरच्या एमआयडीसी भागात असलेल्या गोकूळ बालसदन या अनाथ आश्रमातील मुलांना कोरोनाशी सक्षमतेने लढा देण्यासाठी तोंडाला लावण्यासाठी मास्क आणि सॅनेटायजरचे वाटप केले. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना ‘सेसा’च्या सर्व सदस्यांनी गोकुळ बालसदन येथे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषयी जनजागृती केली व तेथील बालकांना धीर देत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी निखिल पोतदार, निखिल नारायणपुरे, ऋतुज जाधव, आशीष गोखले, सुरज येलमाटे, ऋषीकेश क्षिरसागर, पार्थ माचिले, शिवाजी साळुंके उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य नरेंद्र खटोड, संगणक विभाग प्रमुख श्रीकांत तांदळे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.