Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तिमत्त्व’- प्रा. डॅा. विश्‍वनाथ कराड

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तिमत्त्व’- 
प्रा. डॅा. विश्‍वनाथ कराड


३ फेब्रुवारी २०२० रोजी  एमआयटी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठांचे कुलपती ‘दूरदर्शी -शिक्षणयोगी’ प्रा. डॅा. विश्‍वनाथ दा. कराड सर हे ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. लातूरजवळील रामेश्‍वर (रुई) या छोट्या खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले व स्वकर्तृत्वावर शिक्षण क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवून अमेरिकेच्या ‘साल्ट लेक सिटी’ या शहरात संपन्न झालेल्या धर्मपरिषदेत आपले विचार व्यक्त करताना जगातील इतर देशातून आलेले धर्मगुरू, विचारवंत, श्रोते यांच्याकडून टाळ्यांची दाद मिळविणारे व्यक्तिमत्त्व प्रा. डॅा. कराड, हे एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे, असं म्हणावं लागेल. त्याचीच प्रचिती म्हणून की काय? आज त्यांच्याच नावे पुण्यातील कोथरूड संकुलात ‘डॅा. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ’ राज्य शासनाच्या मान्यतेनुसार कार्यरत झाले आहे.  गतवर्षी ७ ते ९ जून रोजी टोकिया -जपान येथील ‘जी-२० इंटरफेथ फोरम २०१९’ या गोलमेज परिषदेस उपस्थित राहून त्यांनी आपले उपयुक्त विचार सादर केले.


पहिल्यापासूनच शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने वावर असल्याने, शैक्षणिक गुणवत्ता, परीक्षा, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, भारतीय संस्कृतीवर आधारित ‘वैश्‍विक मूल्याधिष्ठीत शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास’ प्रमाणपत्र परिक्षेचा त्यांनी ध्यास घेतला आणि ही परीक्षा राज्यस्तरावर विविध केंद्रावर घेेेऊन विविध विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी तडीस नेले आहे. Physically fit, mentally alert, intellectually sharp and spiritually elevated so as to develop the winning personality. या ब्रीदाला अनुसरून आपला विद्यार्थी केवळ पदवीधर किंवा सुशिक्षित होता कामा नये. त्याच्या शिक्षणात संस्कृतीचा ओलावा असावा. तो सुसंस्कृत व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे. गणवेश, विश्‍वशांती प्रार्थना, पसायदानाने कार्यक्रमाची सांगता या गोष्टी शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात आणण्याचे अतिशय महत्त्वाचे व अवघड कार्य त्यांनी केले आहे. चांगल्या गोष्टीसाठी आग्रही भूमिका घेण्याचा त्यांचा स्वभाव यामुळेच एमआयटीचे शिल्प घडले व ही संस्था नावारूपाला आली.
आज शिक्षणक्षेत्रातील विविध विद्याशाखा जसे अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, नौकाअभियांत्रिकीशास्त्र, तंत्रनिकेतन, फॅशन टेक्नॅालॅाजी, वास्तुविशारद महाविद्यालय, जैवअभियांत्रिकी महाविद्यालय, कायदाशास्त्र, चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, संगीत कला अकादमी, राज कपूर मेमोरिअल, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थना गृह व विश्‍वशांती ग्रंथालय, गुरूकुल पद्धतीच्या शाळा, इंग्रजी/मराठी माध्यमाच्या शाळा, एमआयटी-आर्टस् डिझाईन टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, डॅा. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे, अवंतिका युनिव्हर्सिटी, उज्जैन (मध्यप्रदेश), युनिव्हर्सिटी अ‍ॅाफ टेक्नॅालॅाजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, शिलॅांंग, मेघालय, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, अमरावती (आंध्रप्रदेश) आदि विद्यापीठांचा विस्तार मा. प्रा. कराड सरांच्या कल्पक नेतृत्वाखालीच होत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ‘विश्‍वराज हॅास्पिटल’ म्हणजे शिक्षणाबरोबरच जनसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन आपण आभियांत्रिकीबरोबर ‘धन्वंतरीचे’ उपासक आहोत, हेही त्यांनी दाखवून दिले आहे.


प्रा. कराड सरांना सर्वधर्मीय साधू-संताचे विचार व सहवास मनापासून भावतात. खर्‍या अर्थाने भारतीय घटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ या तत्त्वाचे पालन करणे, हा त्यांचा ध्यास आहे.  राष्ट्रहित, सामाजिक सलोखा व समाजकल्याणाच्या हेतूने श्रीरामजन्मभूमी-बाबरी मस्जिद विवाद सामोपचाराने सुटावा यासाठी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अयोध्येला त्यांनी भारतातील नामवंत शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मपंडित, शिक्षणतज्ज्ञ, थोर विचारवंतांच्या ‘विश्‍वशांती प्रतिनिधी मंडळासोबत’ ७ जानेवारी २०१८ ला भेट देऊन त्या ठिकाणी ‘विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाची’ एक अभिनव व वैशिष्ठ्यपूर्ण संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. विज्ञान व अध्यात्म यांच्या समन्वयातून जगात शांतता नांदेल, या संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॅा. विजय भटकर, यांना बरोबर घेऊन ते कार्यरत आहेत. स्वामी विवेकानंद, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या विचारांचे प्रतिबिंब एमआयटी च्या कार्यप्रणालीत दिसून येते. शिक्षण, अध्यात्म आणि समाजकारण या तीनही क्षेत्रांची सांगड त्यांनी उत्तम प्रकारे साधलेली आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयस्थानी असणार्‍या श्री क्षेत्र पंढरपूरचा पांडुरंग, आळंदीचे ज्ञानेश्‍वर माऊली, देहूचे संत तुकाराम महाराज या लोकदेवतांचे ते खर्‍या अर्थाने उपासक आहेत. “ओम आणि योगशास्त्र ही भारताने जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे. दोन्हींचा आपण अंगिकार केला, तर आपल्यामध्ये सकारात्मक मानसिकता तयार होण्यास मदत होईल”.


आपण ज्या समाजात लहानाचे मोठे होतो, त्या समाजाची सामाजिक बांधिलकी, ऋण, ज्या गावात जन्मतो त्या मातीची नाळ जपली पाहिजे,अशी त्यांची धारणा आहे. म्हणूनच की काय प्रतिवर्षी नाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी त्यांच्या रामेश्‍वर गावी भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा सहभाग असतो. गावस्तरावर एवढी मोठी कुस्ती स्पर्धा भरवून त्यांनी गावाचे नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे. देशी-विदेशी लोकांशी त्यांचा स्नेहबंध तर आहेच, पण त्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांचा लोकसंग्रह सुद्धा त्यांनी जपलेला आहे. पण तरीही आजमितीला त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी स्वत:ला जोडून घेतलेले नाही. “जे बोलतात तेच करतात आणि जे करतात तेच बोलतात”, या उक्तीनुसार त्यांच्या मनात आलेली संकल्पना ते सत्यात उतरवितातच. कामाच्या बाबतीत काटेकोरपणा आणि शिस्तीचे ते भोक्ते आहेत.


 भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०१८ रोजी, पुण्याजवळील राजबाग, लोणीकाळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात उभ्या रहात असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या घुमटाकार तत्वज्ञ संत श्री. ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थनागृहाच्या कलशारोहणाचा नेत्रदिपक सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. १३ वर्षापूर्वी त्यांनी पाहिलेले विश्‍वशांती प्रार्थनागृहाचे स्वप्न आजमितीला सत्यात उतरले आहे.


लोणी काळभोर येेथील विश्‍वराजबाग परिसरातील एमआयटी-आर्ट, डिझाईन टेक्नॅालॅाजी विद्यापीठाच्या प्रांगणात तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्‍वर प्रार्थना सभागृह व ग्रंथालय साकारलेले आहे. ही वास्तू स्थापत्य कलेचा एक मेरूमणी ठरणार आहे. या वास्तूला आच्छादणारा घुमट हा जगातील सर्वात मोेठा घुमट ठरला आहे. ज्याचा व्यास १६० फूट आहे. घुमटाच्याखाली एक विशाल प्रार्थनागृह आहे. सभोवताली १८० विशालकाय स्तंभ आहेत. जगभरातल्या विविध भाषांमधले विज्ञान, धर्म, तत्त्वज्ञान, कला, संगीत आणि संस्कृती या विषयामधले अनमोल आणि दुर्मिळ ग्रंथ या ग्रंथालयाला संपन्न करणार आहेत. सर्व पुस्तके व ग्रंथ ग्रंथालयात गोलाकार उभारलेल्या १०८ स्तंभांवर आकर्षक पद्धतीने मांडण्यात येणार आहेत.


 दि. ०२ अ‍ॅाक्टोेबर २०१८ या दिवशी भारत देशाचे उपराष्ट्रपती मा.श्री. व्यंकय्या नायडू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या वास्तूचे भारतमातेला लोकार्पण संपन्न झाले. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल महामहीम श्री. सी. विद्यासागर राव हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. संपूर्ण विश्‍वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रा. कराड सरांच्या नेतृत्वाखाली दि. ०२ ते ०५ अ‍ॅाक्टोबर २०१८ या दरम्यान जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञान परिषद, २०१८ या प्रार्थनागृहात संपन्न झाली.


या अद्भूत वास्तूचे आणखी एक जगावेगळे वैशिष्टय म्हणजे मुख्य प्रार्थना सभागृहाच्या आत गोलाकार व बाहेरच्याही बाजूला गोलाकार पद्धतीने, उंच चबुतर्‍यांवर २० फूट उंचीचे ५४ देखणे पुतळे विराजमान झाले आहेत. जगाच्या इतिहासात उत्तुंग कार्य केलेल्या व मानवी कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन सर्वस्वी अर्पण केलेल्या शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, संत, धर्मगुरू, साहित्यिक अशा महान विभूतींच्या महाकाय पुतळ्याची निर्मिती ब्राँझ धातूमध्ये केली आहे. येणार्‍या भविष्यकाळात ही वास्तू जगातील एक अद्भूत शिल्प म्हणून ओळखली जाईल, पुण्यनगरीचा पर्यायाने, महाराष्ट्राचा तो मानबिंदू ठरेल व त्यानिमित्ताने केवळ पुण्याचेच नाही, महाराष्ट्राचेचं नाही, तर अखंड भारताचे नाव पुन्हा एकदा संपूर्ण विश्‍वपटलावर तेजाने तळपत राहील!
१९ फेब्रुवारी २०१९ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मॅनेट महाविद्यालयात आवारात केले. ज्यांचा आदर्श घेऊन हजारो विद्यार्थी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नावारूपाला येतील. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत ६ एप्रिल २०१९ रोजी गोल घुमटालगत ज्ञान-विज्ञानाधिष्ठित वैश्‍विक भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा मानवता, सहिष्णुता, विश्‍वशांती आणि ‘एकं सत् विप्रा बहुधा वदंती’ व ‘वसुधैव कुटुंबकम्’ असा महान संदेश देणार्‍या ‘श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचा’ उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर श्रद्धेय श्रीकृष्ण कर्वे गुरूजी यांच्या संकल्पनेवर आधारीत राजबाग परिसरातील आवारात ‘विश्‍वदेवता दर्शन देवता मानवता मंदिराचा’ ७ अ‍ॅाक्टोबर २०१९ रोजी परमपूज्य आदरणीय श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
‘सर्वोत्कृष्टता’ आणि ‘भव्यता’ हा त्यांचा प्रत्येक कामातला पहिला निकष आहे, मग त्या एमआयटीच्या इमारती असो किंवा वर्षभर चालणारे विविध कार्यक्रम असोत. प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्टच झाली पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन असतो. सर्वोत्कृष्टतेचा अविष्कार घडविण्यासाठी आपल्या भोवतालची यंत्रणा किंवा माणसं समर्थपणे घडविण्याची त्यांची क्षमता अप्रतिम आहे. ही क्षमता त्यांनी घेतलेल्या जीवनानुभवाच्या खोलीतून आली आहे. एमआयटी संस्थेशी संलग्न असताना एका कार्यक्रमावेळी खुर्च्याची रचना पाहण्याचं काम माझ्याकडून राहून गेलं आणि त्यामुळे ते माझ्यावर रागावले. तरीही त्या क्षणामुळे मी आनंदित झालो, कारण माझ्या वयाच्या ६४ व्या वर्षी इतक्या अधिकारानं माझ्यावर रागावणारं असं कुणी माझ्या आयुष्यात उरलेलं नाही. बाह्यांगी कडक शिस्तीचे जाणवणारे प्रा. डॅा. कराड आतून मात्र निर्मळ, मृदू स्वभावाचे आहेत. यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना सुद्धा सर आपल्या यशाचं श्रेय त्यांचे सहकारी, संपूर्ण वारकरी संप्रदाय, आपल्या थोरल्या भगिनी कै. त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांना देतात.


गुरूशिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, असे सरांच्या नेहमीच्याच वक्तव्यातून समजते. भविष्यात माझ्यासारख्या अनेकविध शिक्षकांना हे गुरुकुल नक्कीच प्रेरणादायी ठरेल. स्वामी विवेकानंद हे सरांचे आदर्श आहेत. अत्यंत सामान्य स्थितीत राहूनही असामान्य विचारांचे संतुलन करत त्यांनी आपल्या आयुष्यातील कर्मयोग साधला आहे. विश्‍वातील प्रगत, अप्रगत, गतीमान व स्थितीमान संस्कृतींचे प्रबोधन आपल्या कवेत घेण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ स्तुत्य नाही तर मानव्याची मेघडंबरी सतत सुशोभित करणारा आहे. मला या सार्‍या पार्श्‍वभूमीवर आठवतात ते आषाढी एकादशीसाठी हातात टाळ घेऊन वाखरीच्या तळावरून पंढरपूरकडे चालत निघालेले वारकरी प्रा. कराड सर! मला दिसतात तळमळीने आळंदी-देहू परिसर विकासाची माहिती देणारे तंत्रज्ञ जाणकार! आणि मी पाहतो एक छायाचित्र मानवी हक्क व शांततेच्या युनेस्कोच्या अध्यासन केंद्राचे प्रमुख म्हणून स्वाक्षरी करणारे प्राचार्य विश्‍वनाथ दा. कराड सर! मला दिसतात पद्मभूषण प्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर आणि ह.भ.प.साखरेमहाराज यांच्याबरोबर हितगुज करत असलेले प्रा डॅा. कराड साहेब...!! राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक धोरणासोबतच सामाजिक द्रष्टेपणाची जाण ठेऊन विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाची संकल्पना पाहणारे दूरदर्शी-शिक्षणयोगी डॅा. कराड सर! एमआयटीच्या कॅम्पसवर कुडता-धोतर या पोशाखातील एक शिक्षणतज्ज्ञ व संस्थेचा पालक असलेले दूरदृष्टीचे एक असाधारण प्रतिभासंपन्न प्राध्यापक आहेत!


‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा’ असेच ज्यांचे मला एकाच वचनात आदराने वर्णन करावे लागेल. जीवेत शरद: शतम् !! ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.


श्री. दिलीप फलटणकर,
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक,
बी/५०१, रिद्धी सिद्धी को. हौ. सोसायटी
साई चौक, बालेवाडी, पुणे-४११०४५
भ्रमणध्वनी: ९८८१४१९७९६


 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post