Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'पातळी सोडाल तर याद राखा!' आ. संभाजी पाटील यांची अमित देशमुख यांना जाहीर तंबी

'पातळी सोडाल तर याद राखा!'
आ. संभाजी पाटील यांची अमित देशमुख यांना जाहीर तंबी 

हनुमान चौकातील विराट जनसभेने डॉ. अर्चनाताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब 





    लातूर/प्रतिनिधी : राजकारण करायचे असेल तर मर्दासारखे करा. समोरासमोर मैदानात उतरा. आमच्या भगिनीवर, सन्मान्य महिलांवर टीकाटिप्पणी करू नका. खालच्या भाषेत बोलू नका. त्या भाषेत आम्हालाही बोलता येते. पण आमच्यावर संस्कार असल्याने आम्ही तोल सुटू देत नाही. यापुढे बोलताना पातळी सोडाल तर याद राखा. जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा शब्दात माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आ. अमित देशमुख यांना थेट तंबी दिली.

    गेल्या कांही दिवसात आ. अमित देशमुख व त्यांच्या समर्थकांकडून केलेल्या वक्तव्यांना अनुसरून आ.  निलंगेकर यांनी उपरोक्त शब्दात आम्ही सर्व जण डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.
     लातूर शहर मतदार संघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ हनुमान चौकात आयोजित विराट जनसभेस संबोधित करताना आ. निलंगेकर बोलत होते. मंचावर माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, राष्ट्रवादीचे ॲड. व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील, शिवसेनेचे नेते ॲड.बळवंत जाधव, जिल्हाप्रमुख सचिन दाने, भाजपा माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन शेख, सुधीर धुत्तेकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जोगेंद्र कवाडे गटाचे डी. ई. सोनकांबळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

      सभेला मार्गदर्शन करताना आ.संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, काँग्रेसकडून एका महिलेचा अवमान होत आहे. सोशल मीडियातून अवमानकारक मजकूर आणि व्हिडिओ वारंवार पसरवले जात आहेत. पण यापुढे असे चालणार नाही. चुकून जरी असे बोलाल तर क्षमा केली जाणार नाही. आम्ही क्रिकेट खेळणारे भाऊ नाही तर कुस्ती खेळणारे खमके भाऊ आहोत. त्यामुळे यापुढे विचार करा. एक महिला काय करू शकते? हे तुम्हाला माहीत नाही. आम्ही खंबीरपणे डॉ. अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत, असेही आ. निलंगेकर म्हणाले.

     १५ वर्षात काय केले? असा प्रश्न विचारल्याने देशमुख यांना राग आला असेल. पण आपण काम केले असते तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. अमित देशमुख हे हवाई आमदार असल्याची टीका करत आता लातूरकरांना निवासी आमदार हवा असल्याचे आ. निलंगेकर म्हणाले. लातूरकरांना ८  दिवसाला पाणी मिळते. कारखान्याला मात्र रोज पाणी पुरवठा होतो. अमित देशमुख विकासाच्या रकमेची आकडेवारी सांगतात पण ती खोटी आहे. या योजना तर भाजपाने मंजूर केल्या आहेत. सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल भाजपाने मंजूर केले. देवेंद्र फडणवीस यांनी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. मनपात भाजपाची सत्ता असताना रोज घंटागाडी येत होती पण टेंडरची टक्केवारी न मिळाल्याने देशमुख यांनी ती व्यवस्था बंद पाडल्याची टीकाही आ. निलंगेकर यांनी केली.

     बाभळगाव अँड कंपनी लातूरकरांचे शोषण करत आहे. आता लातूरकरांना आपल्या भविष्याची काळजी करावी लागणार आहे. शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातुरात गांजा आणि ड्रग्सचा व्यापार होत असून हे पुरवठादार कोणाचे हस्तक आहेत? असा सवालही आ. निलंगेकर यांनी उपस्थित केला.

     पाणी प्रश्नाचे काय झाले? असे विचारणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण झाली. या मारहाणीचा बदला २० तारखेला मतदान करून व्यापारी घेतील. शहरात आज संपवून टाकण्याची, गुंडगिरीची व दादागिरीची भाषा होत आहे. शहर सुरक्षित ठेवायचे असेल तर काँग्रेसला हद्दपार करा असे सांगून "लडका बिगड गया है,उसे अब घर बिठाओ" असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.

    आता शेवटच्या टप्प्यात लक्ष्मी दर्शन होईल. लक्ष्मीला नाही म्हणू नका पण खऱ्या लक्ष्मीला मतदान करा. विलासरावांच्या नावाचा चेक आपण तीनदा कॅश केला. पण आता तो बाउन्स होणार आहे. विकासाची गंगा लातुरात आणण्यासाठी अफवांवर विश्वास ठेवू नका. रडून भावनिक आवाहन केले तर त्याला भुलू नका. देशमुखांना हवेतून जमिनीवर आणण्यासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.

     माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांनी १९८० पासून घरात सत्ता असतानाही जनतेला पाणी न मिळणे ही शोकांतिका असल्याचे सांगितले. लातूरकरांनी देशमुख यांना एवढे वर्ष का सहन केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मतदारांना हिशोब मागण्याचा हक्क आहे. आपल्या बहिणी पाण्यासाठी वणवण भटकवण्यातच अमित देशमुख यांना आनंद वाटतोय. आता परिवर्तन केले नाही तर देशमुख लातूरच्या जनतेला च्युईंगम बनवतील,असेही खुब्बा म्हणाले.

     आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, डॉ. अर्चनाताई पाटील यांना मत म्हणजे शिवराज पाटील यांना मत आहे. देशमुख यांनी घोषणा केलेले उजनीचे पाणी आलेच नाही. आता अर्चनाताई पाटील पाणी आणतील. लातुरचा कचरा ही 'देवघर'ची गृहलक्ष्मीच स्वच्छ करेल. लातूरचे राजपुत्र आतापर्यंत कधी रस्त्यावर उतरले नाहीत. आता त्यांना जनता आठवत आहे. काँग्रेसमध्ये लुटारूंचा कारभार सुरू आहे. देशमुख सांगतात त्यातील ६०० कोटी रुपये तर आम्हीच दिले आहेत. मल नि:सारण प्रकल्पासाठी जागा, अमृत योजना, शादीखाना, नाट्यगृह, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, लिंगायत स्मशानभूमी, स्वच्छता गृहे, शौचालये आम्ही दिली. तुम्ही काय केले? असा सवालही आ. पवार यांनी उपस्थित केला.

     बसवराज पाटील मुरूमकर यांनी डॉ. अर्चनाताई पाटील लातूरकरांची स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला. जनतेने विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. लातुरचे वैभव वाढवण्यात चाकूरकर परिवाराचे योगदान आहे. आताही ताई कमी पडणार नाहीत. ताईंना मत दिले तर लातुरकरांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळेल, असेही बसवराज पाटील म्हणाले.

      उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, १५ वर्षांचा हिशोब मी मागत नाही तर लातूरची जनता मागत आहे. आजवर तुमचे मत गृहीत धरले जात होते. त्यामुळे प्रश्न विचारण्याची संधी मिळत नव्हती. "सवाल तो हम पूछेंगे" असे म्हणत लातुरकरांना पाणी मिळाले का? व्यापाऱ्यांच्या अडचणी सुटल्या का? वैद्यकीय व औद्योगिक विश्वात कोणाची दहशत आहे? ट्युशन एरियात काय चाललेय? अशी प्रश्नांची सरबत्ती डॉ. अर्चनाताई पाटील यांनी केली. लातूरकरांना झुलवत ठेवण्याची परंपरा मोडायची आहे.जनतेला विश्वास व सन्मान हवा आहे. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवायचा आहे. माझे भाऊ माझ्या पाठीशी आहेत. दुसऱ्यांच्या मतदार संघात जाऊन 'करेक्ट कार्यक्रम करतो' म्हणणाऱ्यांचा 'कार्यक्रम' करण्यासाठी आ. संभाजीभैय्या इथे आले आहेत, असेही डॉ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या.

      डॉ. सुनिल गायकवाड, देविदास काळे, ॲड. व्यंकटराव बेद्रे, ॲड.
बळवंत जाधव, सचिन दाने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. विकास कारखान्याचे १५ वर्षांपासूनचे कर्मचारी युसुफ शेख तसेच काँग्रेसच्या शेकडो बुथ कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात जाहीर प्रवेश केला.

    या विराट जनसभेस रुद्रालीताई पाटील चाकूरकर, ॲड. दिग्विजय काथवटे, अजित पाटील कव्हेकर, मंगेश बिराजदार, गणेश गवारे, मीनाताई गायकवाड, सौ. शोभा पाटील, प्रविण सावंत यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

चौकट...
 *गर्दीचा मोडला उच्चांक ...
   मंगळवारी सायंकाळी हनुमान चौकात झालेल्या विराट सभेने गर्दीचे उच्चांक मोडीत काढले. हनुमान चौकात उभारलेल्या व्यासपीठापासून गोलाईतील देवीच्या मंदिरापर्यंत हजारोंचा जनसमुदाय सभा ऐकण्यासाठी दाटीवाटीत बसला होता. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर उभे राहून अनेकांनी नेत्यांच्या भाषणांना दाद दिली.टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. अर्चनाताई पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

* लाडक्या बहिणी जातीने हजर...
     लातूर मतदार संघात डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या रूपाने प्रथमच एका महिलेला संधी देण्याचे काम भाजपा महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यामुळेच हनुमान चौकात झालेल्या सभेला हजारो 'लाडक्या बहिणीं'नी उपस्थिती दर्शवल्याचे दिसून आले.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post