Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जागतिक ग्राहक दिन विशेष ..जागरूक ग्राहक बना, दक्ष राहून खरेदी करा !

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जागतिक ग्राहक दिन विशेष ..जागरूक ग्राहक बना, दक्ष राहून खरेदी करा !


· ‘एमआरपी’पेक्षा जास्त दराने विक्री, वजनात फसवणुकीची करा तक्रार

· वैध मापन शास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्यास होते कारवाई

लातूर, दि. 14 (जिमाका) : बाजारातून, ई-कॉमर्स संकेतस्थळावरून कोणत्याही वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. आपली फसवणूक होवू नये, यासाठी दक्ष राहून खरेदी करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक स. या. अभंगे यांनी केले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी कार्यरत असलेल्या वैध मापन शास्त्र उप नियंत्रक कार्यालयामार्फत सन 2022-23 मध्ये वैध मापन शास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातील 173 व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्राहकांना योग्य वजनात व मापात माल मिळावा, यासाठी वैध मापन शास्त्र विभागामार्फत व्यापाऱ्यांकडील वापरात असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक काटे, वजन व मापे यांची वैध मापन शास्त्र विभागामार्फत तपासणी करून त्यावर सील केले जाते. सन 2022-23 मध्ये लातूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडील इलेक्ट्रॉनिक काटे, वजन व मापे यांची पडताळणीपोटी 1 कोटी 14 लक्ष 83 हजार रुपये फी वसूल करण्यात आली आहे.

वैध मापन शास्त्र कायदा उल्लंघन प्रकरणी 18 लाखांचा दंड वसूल

वैध मापन शास्त्र कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील 173 व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विहित मुदतीत इलेक्ट्रॉनिक काटे, वजने व मापे तपासणी न करणे, वजनात माल कमी देणे, एमआरपी पेक्षा अधिक दराने विक्री करणे, एमआरपीमध्ये खाडाखोड करणे, दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंवर एमआरपी, उत्पादन तारीख, उत्पादकाचे नाव व पत्ता, वस्तूचे निव्वळ वजन, ग्राहक तक्रार क्रमांक न छापणे आदी प्रकरणांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये 18 लाख 66 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ग्राहकांच्या तक्रारींवरून 20 आस्थापनांवर कारवाई

वैध मापन शास्त्र कायद्यानुसार उत्पादकाने ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स संकेतस्थळावर वस्तू दाखवताना त्यावर वस्तूची किंमत, वजन व उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता टाकणे करणे बंधनकारक आहे. सन 2022-23 मध्ये जिल्ह्यातील 27 ग्राहकांच्या तक्रारी वैध मापन शास्त्र विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी 20 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन

वजनात माल कमी देणे, ‘एमआरपी’पेक्षा जास्त दर आकारणे, ‘एमआरपी’मध्ये खाडाखोड करणे, उत्पादकाचा नाव व पूर्ण पत्ता न छापणे, आवेष्टित वस्तूवर उत्पादनाची तारीख न छापणे, ग्राहक तक्रार निवारण क्रमांक न टाकणे याबाबतच्या तक्रारी वैध मापन शास्त्र विभागाकडे करता येतात. याबाबतची तक्रार राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1800 11 4000 किंवा 195, लातूर व धाराशिव जिल्ह्यासाठी उप नियंत्रक वैध मापन शास्त्र विभागाचा 02382-245207 हा दूरध्वनी क्रमांक किंवा aclmlatur@yahoo.in याठिकाणी नोंदविता येईल, असे वैध मापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक स. या. अभंगे यांनी कळविले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post