Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरमधले चौदा घर व पाचशे घर मठ ...!!

लातूरमधले चौदा घर व पाचशे घर मठ ...!!
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त
विशेष लेखमाला (भाग-3)






जागतिक वारसा सप्ताह 19 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत असतो. आपला संपन्न वारसा लोकांना कळावा, त्याचे जतन व्हावे... तो वारसा गौरविला जावा... हा सप्ताह मागचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील नागरिकांना आपलाही संपन्न वारसा कळावा म्हणून आम्ही 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर "वारसा लातूरचा" ही लेखमाला देत आहोत. या लेखमालेचा हा तिसरा भाग...!!
           
लातूर शहरात जैनांचे वास्तव्य होते. सम्राट अमोघवर्ष (इ.स. 814 ते 880) हा धर्मनिष्ठ जैन राजा होता. जैन धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अनेक मठ-मंदिरे लातूर परिसरात उभारली गेली. श्री. मूलनायक 1008 चिंतामणी पार्श्वनाथंचे मंदिर, जैन गल्लीतील दिगंबर जैन मंदिर, भगवान शांतीनाथाची सात फूट उंचीची मूर्ती याची साक्ष आहे. 

लातूर येथील दिगंबर जैन मंदिरामध्ये भट्टारक परंपरा जुनी आहे. जनार्दन नावाचे कवी या भट्टारक परंपरेतील असून ते भट्टारक चंद्रकीर्ती यांचे शिष्य होते. त्यांनी श्रेणिक पुराण हा चाळीस अध्यायांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात जैन व जैनेतर मराठी वाडमयाविषयी लेखकाचा असलेला अभ्यास व्यक्त होतो. चतुर्थांचे भट्टारक जीवसेन हे सेतवाल जैनांचे भट्टारक विशालकीर्ती म्हणून ओळखले जातात. हे भट्टारक पीठ विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात विराम पावले.

लातूर शहरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवभक्त असलेला हा समाज ‘चौदा घर’ व ‘पाचशे घर’ या दोन मठांना खूप मानतो. या मठांची स्थापना नेमकी केव्हा झाली हे सांगता येणे अवघड आहे. पण या दोन्ही मठांत भाद्रपद वद्य पक्षात भव्य स्वरुपात सप्ताह साजरे होतात. चौदा घर मठात होणारा उत्सव झंगिन्नप्पा महाराज व सिध्दमलस्वामी यांच्या नावाने साजरा होतो. लातूरमध्ये दुसरा मठ पाचशे घर या नावाने प्रसिध्द असून येथेही शिवमंदिर आहे. मन्मथ स्वामींच्या मूर्तींची स्थापनाही या मठात केली आहे.

लातूर ही नगरी प्राचीन, ऐतिहासिक आणि वैभवशाली नगरी असून या नगरीत अनेक राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक स्थित्यंतरे झाली आहेत. कधीकाळी या नगरीत सिध्देश्वर, आत्मलिंग, सोमेश्वर, रत्नेश्वर, घृष्णेश्वर, धुलेश्वर, भीमाशंकर, अमलेश्वर, भूतेश्वर, भैरवेश्वर, हाटकेश्वर रुद्र आणि ज्योतिलिंग रामेश्वर अशी बारा ज्योतिर्लिंगे व सिध्दतीर्थ, नृसिंह तीर्थ, भोगतीर्थ, नागतीर्थ, स्वामीतीर्थ, पद्मतीर्थ, रामतीर्थ आणि पुष्कर अशी आठ तीर्थ होती. त्यातील काही अवशेषरुपात येथे आढळतात. तर काही आजही उत्तम स्थितीत आहेत. या प्राचीन मंदिरे व तीर्थावरून कधीकाळी ही नगरी वैभवसंपन्न असल्याचे जाणवते. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मुघल यांच्या काळात लातूर शहराला प्रशासनात महत्वपूर्ण स्थान होते व आजही या नगरीचा महाराष्ट्रभर गौरवाने उल्लेख केला जातो.

(क्रमशः)

- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post