Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपाच्या कार्यकर्त्यांनो; आता काळजी करू नका राज्यात आपले सरकार आले आहे

भाजपाच्या कार्यकर्त्यांनो; आता काळजी करू नका राज्यात आपले सरकार आले आहे

भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बैठकीत पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांचे प्रतिपादन






         लातूर - गेल्या अडीच वर्षात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने छळ केला भाजपाच्या कार्यकर्त्यांनो आता काळजी करू नका राज्यात आपले सरकार आलं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वांनी एक दिलाने एक ताकतीने तयारीला लागा जनतेची कामे करा त्यांच्या सुख दुःखाचे वाटेकरी व्हा निश्चितच जनता आपल्या सोबत राहते असे राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गिरीश महाजन यांनी बोलून दाखविले.

       पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी लातूर दौऱ्यात आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयाग या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता उपस्थित भाजपा लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील, नांदेड येथील डॉ. अजित गोपछडे, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, किसान मोर्चाचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, बब्रुवान खंदाडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह सर्वच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

         गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात भाजपा सेना युतीला बहुमत मिळाले होते. मात्र निवडणुकीचा निकाल लागताच शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले असे सांगून ना. गिरीश महाजन म्हणाले की भाजपाशी केलेल्या दगा फटक्याची संपूर्ण किंमत शिवसेनेला मोजावी लागत आहे. ५५ पैकी ४० आमदार १८ पैकी १२ खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले, नावही गेलं आणि चिन्ह ही गेलं शिल्लक काय राहिले असा प्रश्न उपस्थित करून गेल्या अडीच वर्षात अनैसर्गिक सुख मिळाले असे बोलून दाखविले.

          उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अडीच वर्षात भाजपाच्या अनेकांचा खूप छळ केला, अनेक वाईट अनुभव अनेकांना आले, मला मोका लावण्याचा प्रयत्न झाला, अटक करण्याचा प्लॅन केला, टोकाच्या भूमिकेवर राजकारण केले, अखेर त्यांचा घडा भरल्याने भाजपाचे मिशन सुरू झाले राज्यसभा विधान परिषद निवडणुकीनंतर सत्तांतर होऊन राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आले आता कुठेतरी बरं वाटतंय असेही ना. गिरीश महाजन यांनी बोलून दाखवले.

           जात, परिवार, पैसा यावर मतदान मिळत नाही त्यासाठी कामच करावे लागते माझ्या मतदार संघात केवळ अडीच हजार माझ्या समाजाचे मतदान आहे तरीही मी सहा वेळा विधानसभेसाठी निवडून आलो असे सांगून ना. गिरीश महाजन म्हणाले की, लातूर जिल्ह्यात भाजपाची ताकद मोठी आहे. संभाजीराव निलंगेकर, रमेशअप्पा कराड, सुधाकर शृंगारे आणि अभिमन्यू पवार हे वजनदार नेते आहेत. या सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, कायम एक राहावे, विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्याची भाजपा एक नंबर वर आणूया असे सांगून सर्वांनी निर्व्यसनी राहावे असे आवाहन केले.

       यावेळी बोलताना माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, राज्यात खऱ्या अर्थाने भाजपाचे सरकार आले असून शंकी गोगलगाय, सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत दिली. आघाडी सरकारने भाजपाच्या एकाही माणसाला मदत केली नाही. त्यामुळे जो भाजपाचा आहे त्यांनाच मदत करण्याचे धोरण घेतले पाहिजे असे सांगून पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांच्या मागे ताकद उभी करावी लागेल असेही त्यांनी बोलून दाखविले.

           भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी अडीच वर्षाच्या वनवासानंतर सत्तेत आल्याचा आनंद होत असल्याचे सांगून यावेळी बोलताना म्हणाले की गेल्या अडीच वर्षात भाजपाचा छळ झाला मात्र कोणताही कार्यकर्ता सत्तेच्या मागे गेला नाही तो विचाराने बांधला आहे. लातूर जिल्ह्याची भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून ग्रामविकास मंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या आशेने पाहत आहेत. येणाऱ्या काळात कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याने त्यांना ताकद देणे गरजेचे आहे.

           आमच्यात काही मतभेद असले तरी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा विरोधकांना विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एक एक होऊन संघर्ष करतो असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा एक नंबर वर असेल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ४५ प्लस हे उद्दिष्ट आहे. तर पुन्हा लातूर महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आहे असे त्यांनी बोलून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले यावेळी जिल्हाभरातील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post