Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यात ‘समता पर्व’ अंतर्गत26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम

जिल्ह्यात ‘समता पर्व’ अंतर्गत26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम






*लातूर, दि. 25 (जिमाका) :* संविधानाची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान निर्मीतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, संविधान दिन अर्थात 26 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब महापरिनिर्वाण दिनापर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी दिली.

संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय, निवासी तथा अनिवासी आश्रमशाळा तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेत संविधान रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येईल. तसेच संविधानाचे वाचन, तसेच ‘संविधान’ विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचे मागदर्शन होईल. जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय, निवासी तथा अनिवासी आश्रमशाळा तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा येथे 27 नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखीपरिक्षा, वकृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयेाजित करण्यत येतील.

28 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान विषयक व्याख्यान होईल. तसेच पत्रकार बांधवांसाठी 29 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर कार्यशाळा होईल.

 ‘संविधान’ या विषयावरील भिंतीपत्रक, पोस्टर्स, बॅनर इत्यादीबाबत जिल्हास्तरावर चित्रकला स्पर्धा 30 नोव्हेंबर रोजी रोजी होईल. याचदिवशीअनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी यांच्यासाठी ‘अनुसूचित जाती उत्थान :दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा 1 डिसेंबर रोजी होणार आहे. 2 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील व तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीला भेटी देण्यात येणार आहेत.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्यामार्फत 3 डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. तसेच सर्व तालुकास्तरावर योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा होईल. 4 डिसेंबर रोजी जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृध्द यांच्यासाठी कार्यशाळा, 5 डिसेंबर रोजी संविधानविषयक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात येईल. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम, सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वाटप, बक्षिस वितरण व समता पर्वाचा समारोप कार्यक्रम होणार असल्याचे श्री. चिकुर्ते यांनी कळविले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post