Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर उपलब्ध

 रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर उपलब्ध



 
लातूर, दि. 27 (जिमाका):-* रब्बी-2022 हंगामामध्ये कृषी उन्नती योजनांतर्गत ग्रामबिजोत्पादन कडधान्य योजनेत हरभऱ्याचे दहा वर्षाच्या आतील फुले विक्रम, राजविजय-202, फुले विक्रांत, ऐ.की.जी. 1109 (पी.डी.के.व्ही. कांचन), आणि दहा वर्षांवरील जॅकी- 9218, विजय बियाणे, तसेच ग्रामबिजोत्पादन योजनेतून दहा वर्षांवरील गहू बियाणे कृषी विभाग व महाबीजमार्फत अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राजविजय-202, फुले विक्रम, फुले विक्रांत, ऐ.की.जी. 1109 (पी.डे.के.व्ही कांचन) 20 किलो हरभरा बियाणाच्या प्रत्येक बॅगची मूळ किंमत एक हजार 400 रुपये असून प्रत्येक बॅग 500 रुपये अनुदान आहे. अनुदान वजा केल्यानंतर 20 किलोची बॅग 900 रुपयांना उपलब्ध होईल. दहा वर्षावरील जॅकी-9218 बियाणाच्या 30 किलोच्या प्रत्येक बॅगची मूळ किंमत 2 हजार 100 रुपये असून त्यावरील 600 रुपये अनुदान वजा केल्यानंतर ही 30 किलोची बॅग एक हजार 500 रुपयांना मिळणार आहे. तसेच मूळ किंमत एक हजार 420 रुपये असलेल्या विजय, दिग्विजय बियाणाच्या 20 किलोच्या प्रत्येक बॅगवर 400 रुपये अनुदान असून ही बॅग एक हजार 20 रुपये अनुदानित दराने उपलब्ध आहे.

गहू बियाणाच्या MACS-6222, GW-496, HI-1544 वाणाची 40 किलोच्या बॅगची मूळ किंमत एक हजार 680 रुपये असून त्यावर 600 रुपये प्रतिबॅग अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ही बॅग एक हजार 80 रुपये अनुदानित दराने महाबीजचे विक्रेते व उपविक्रेत्यांकडे उपलब्ध झालेले आहे.

अनुदानित दराचे दहा वर्षाच्या आतील व दहा वर्षावरील हरभरा वाणाचे बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून परमीट घेवून बियाणे खरेदी करावे. इतर शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे आठ अ व आधारकार्डाची झेरॉक्स प्रत देवून अनुदानित दराने बियाणे खरेदी करावे. एका शेतकऱ्याला त्याच्या ‘आठ अ’वर एक एकरसाठी एक बॅगपर्यत बियाणे अनुदानित दराने खरेदी करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर बियाणे वाटप होणार असून बियाणे साठा असेपर्यंत बियाणे मिळेल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post