ग्रीन बेल्टवर अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल मनपाची कारवाई
यापुढे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही
- मनपा आयुक्तांचा इशारा
लातूर/प्रतिनिधी:अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पालिकेने आता धडक कारावाया सुरू केल्या आहेत.अशाच एका प्रकारात मनपाने ग्रीनबेल्ट म्हणून आरक्षित केलेल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये महानगर पालिकेने सर्व्हे क्रमांक १८ ब मधील जागा ग्रीनबेल्ट साठी आरक्षित केलेली आहे.या जागेवर टाके नगरातील रहिवासी सलीम खय्युम पटेल यांनी अतिक्रमण केलेले होते.
परिसरातील नागरिकांनी याची माहिती मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिली.ही माहिती मिळताच क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी,अतिक्रमण विभाग प्रमुख तय्यबअली शेख,सहाय्यक स्वच्छता निरिक्षक सुरेश कांबळे,रोड कारकून रामकिसन कांबळे,वाहन चालक मुस्तफा शेख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.संबंधित व्यक्तीच्या विरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या ताब्यातील किंवा ग्रीनबेल्टसाठी आरक्षित जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करू नये.यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल,असा इशारा मनपा आयुक्त श्री.अमन मित्तल यांनी दिला आहे.

