चिन्मय सेवा ट्रस्ट व सेवा भारतीच्या वतीने विवेकानंद रुग्णालयास व्हेंटिलेटर प्रदान
लातूर/प्रतिनिधी
मुंबई येथील चिन्मय सेवा ट्रस्ट व रा.स्व. संघ सेवाभारती संस्थेच्या वतीने विवेकानंद रुग्णालयास कृत्रिम श्वसनयंत्र (इनव्हेजिव्ह व्हेंटीलेटर)प्रदान करण्यात आले.हे व्हेंटीलेटर रुग्णांच्या सेवेत कार्यरत झाले आहेत.
लातूर शहरासह मराठवाडा व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून रुग्ण सेवेमध्ये विवेकानंद रुग्णालय अग्रेसर आहे.रुग्णालयात आजपर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.आजही विवेकानंद रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरूच आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णालयाने निभावलेली सामाजिक बांधिलकी पाहता मुंबई येथील चिन्मय सेवा ट्रस्टने एक अद्ययावत कृत्रिम श्वसन यंत्र अर्थात इनव्हेजिव्ह व्हेंटिलेटर रुग्णालयास प्रदान केले.पुणे येथील सेवावर्धिनी संस्थेच्या सहकार्याने हे व्हेंटीलेटर देण्यात आले.हे वेंटीलेटर तात्काळ रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर अर्पण करतेवेळी कार्यवाह डॉ.राधेश्याम कुलकर्णी,डॉ.चंद्रशेखर औरंगाबादकर,प्रसाद कुलकर्णी,रमेश माडजे, सुनील भोगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,सेवा भारती या संस्थेच्या वतीनेही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहता तीन बायपॅप व्हेंटिलेटर व १० ऑक्सिजन कॉंसंट्रेटर रुग्णालयास अर्पण केले आहेत.ही सर्व सामग्री रुग्णसेवेत कार्यान्वित आहे.
कोरोनाची पहिली व दुसरी लाट परतवून लावल्यानंतर तिसरी लाट आलीच तर रुग्णांवर सक्षमपणे उपचार करता यावेत यासाठी विवेकानंद रुग्णालय सज्ज आहे.


