हाफकिन इन्सिटयूट येथील कामासंदर्भात एकत्रित आराखडा करावा
शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख
मुंबई दि. 10 डिंसेबर:
हाफकिन इन्सिटयूट येथील इमारतीचे काम करीत असताना या इमारतीचे हेरिटेज महत्व लक्षात घेऊन बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत पुढील काम करीत असताना याबाबतचा एकत्रित आराखडा करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
हाफकिन इन्स्टिटयूटच्या कामांबाबतचा आढावा घेण्याबाबत बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस हाफकिन इन्सिटयूटच्या संचालक सीमा व्यास यांच्यासह वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह हाफकिन इन्स्टिटयूटचे संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, हाफकिन इन्स्टिटयूट येथे काम करीत असताना बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबात सुधारीत पुरवणी मागणी करणे आवश्यक असून यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम करण्यापूर्वी आपण स्वत: हाफकिन इन्स्टिटयूट येथे भेट देऊन पाहणी करणार आहोत. नियोजन वेळेत काम पूर्ण करण्यासाठी एकत्रित आराखडा हाफकिन इन्स्टिटयूटने तयार करुन वैद्यकीय शिक्षण विभागास सादर करावा.